‘झुकिनी’ या विदेशी भाजीपाला पिकातून लाखोंचा नफा ! सोनवटीच्या तरुणांची कामगिरी

सेलू तालुक्यातील सोनवटी येथील तरुण शेतकरी विराज अंबादास सोळंके याने आपल्या शेतामध्ये झुकिनी या विदेशी पिकाची लागवड करून अल्पावधीतच लाखो रुपयांचा नफा कमवला आहे.

झुकिनी हे काकडीसारखे दिसणारे परंतु टेबल पर्पज खाण्यासाठी वापरणे जाणारे पीक असून मोठ्या शहरांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या पिकाला मोठी मागणी आहे. विराज हा नूतन महाविद्यालय येथे संगणकशास्त्रामध्ये पदवीचे शिक्षण घेत असून तो वडील अंबादास सोळंके यांना शेतीच्या कामातही मदत करतो. मागील वर्षी बारामती मध्ये कृषी प्रदर्शनात विराजने झुकिनी हे काकडीसारखे पीक पाहिले. आपल्या शेतात एका एकरावर त्याने झुकिनीची लागवड केली. लागवड करते वेळेस त्याने एकरी 4 हजार झाडांची ठिबक सिंचन करून बेडवर लागवड केली. झुकिनी या पिकाचे 35 दिवसानंतर उत्पादन सुरू होते आणि पुढील 40 ते 50 दिवस या पिकापासून तोडे निघतात. विराजने दोन महिन्यांमध्ये दहा टन एवढे झुकिनीचे उत्पादन काढले. पुणे येथील एका व्यापाऱ्याशी करार पद्धतीने प्रति किलो तीस रुपये प्रमाणे विक्री केली. यातून त्याला तीन लाख रुपये मिळाले.

झुकिनी पिकाचा लागवड खर्च म्हणजे, जमीन तयार करणे, लागवड, ठिबक सिंचन, रोग व्यवस्थापन आणि वाहतूक असा दीड लाख रुपये खर्च झाला. खर्च वजा जाता विराजला निव्वळ दीड लाख रुपये नफा मिळाला. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पिकाची पाहणी करून कीड रोगाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. सद्यस्थितीमध्ये गावातील इतर दोन शेतकऱ्यांनी सुद्धा झुकिनी या पिकाची लागवड सुरू केली आहे. झुकिनी हे पीक फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळायला हरकत नाही असे विराज सोळंके म्हणाला.