झोपडपट्टी पुनर्वसन योजना गणेश नाईकांमुळेच रखडली; नवी मुंबईत ‘झोपू’वरून मिंधे-भाजपात जुंपली

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून नवी मुंबईत मिंधे व भाजपात चांगलीच जुंपली आहे. आमदार गणेश नाईक यांना निवडणुका आल्या की झोपू योजना आठवते. मात्र 30 वर्षे एकहाती सत्ता असताना त्यांना हा प्रश्न तडीस लावता आला नाही. ही योजना नाईकांमुळेच रखडली आहे अशी टीका करत मिंधे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौघुले यांनी 31 जुलैपर्यंत झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबाबत तोडगा निघाला नाही तर 1 ऑगस्टपासून उपोषणाला बसेन असा इशाराच खोके सरकारला दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे व भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

नवी मुंबईत दिघ्यातील गणपती पाडा, ईश्वरनगर, रामनगर, साठेनगर, विष्णूनगर, विजयनगर, रामजी आंबेडकरनगर, चिंचपाडा, ऐरोलीत ऐरोली नाका, समतानगर शिव कॉलनी, रबाळे येथील आंबेडकरनगर, भीमनगर, घणसोलीतील अर्जुनवादी, महापे येथील संभाजीनगर, पावणेगाव, अडवली भुतावली अशा एकूण 28 झोपडपट्ट्यांमध्ये झोपू योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षणदेखील सुरू झाले, परंतु भाजप आमदार गणेश नाईक यांनी या योजनेबाबत दिशाभूल करत दहा चटईक्षेत्र दिले तर पायाभूत सुविधांवर ताण पडेल असे सांगून या योजनेत खोडा घातल्याचा आरोप विजय चौघुले यांनी केला आहे. मात्र बोनकोडे परिसरात किती बेकायदा इमारती आहेत, त्यांचा ताण पायाभूत सुविधांवर पडत नाही का, असा सवाल आमदार नाईक यांना केला. झोपू योजनेचा प्रश्न मार्गी न लागल्यास १ ऑगस्टपासून आंदोलन करू असा इशारा देऊन त्यांनी खोके सरकारला घरचा आहेर दिला आहे.

भाजपने लोकसभेत केवळ 9 हजारांचे मताधिक्य दिले

लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईत मिंध्यांच्या घटलेल्या मताधिक्यावर चौघुले यांनी नाईकांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही एकदिलाने काम केले म्हणून नाईकांना 40 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र आता भाजपने काम न केल्याने आमच्या उमेदवाराला केवळ 9 हजारांचे मताधिक्य मिळाले असा आरोपदेखील त्यांनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध मिंधे असा सामना रंगणार आहे.