झिम्बाब्वे हरारे! हिंदुस्थानचा विजयी चौकार, 4-1 ने मालिका विजय

यजमान झिम्बाब्वे पुन्हा हरारेत हरला आणि हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने विजयाचा चौकार ठोकत पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने सहज खिशात घातली. सलामीच्या लढतीतील अनपेक्षित पराभवानंतर नव्या दमाच्या संघाने विजयाचा चौकार ठोकून टी-20 क्रिकेट मालिकेत झिम्बाब्वेची दाणादाण उडविली.

पाचव्या व अखेरच्या सामन्यात हिंदुस्थानने झिम्बाब्वेपुढे 168 धावांचे आव्हान उभारले होते तर मुकेश कुमारच्या भेदक माऱयाने यजमानांचा 18.3 षटकांत 125 धावांतच डाव उधळला आणि पाचवा सामना 42 धावांनी जिंकला. झिम्बाब्वेकडून तडीवानशे मरूमणी (27), डायन मायर्स (34) व फराज अक्रम (27) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजीचा थोडा फार प्रतिकार केला. हिंदुस्थानकडून मुकेश कुमारने चार विकेट टिपत झिम्बाब्वेला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. शिवम दुबेने 2, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर व अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला. त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 6 बाद 167 धावसंख्या उभारली. यशस्वी जैसवालने लागोपाठ दोन षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र, कर्णधार सिपंदर रझाने चौथ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवून झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल (13) व अभिषेक शर्मा (14) यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले.

मधल्या फळीचा प्रतिकार

आघाडीची फळी लवकर तंबूत परतल्यानंतर संजू सॅमसन (58), रियान पराग (22) व शिवम दुबे (26) या मधल्या फळीतील फलंदाजांनी फटकेबाजी केली म्हणून हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. सॅमसनने 45 चेंडूंत 58 धावा करताना एका चौकारासह 4 टोलेजंग षटकार ठोकले. दुबेने 12 चेंडूंत 2 षटकार व तितकेच चौकार लगावत 26 धावांची खेळी केली. तो धावबाद झाल्यानंतर रिंकू सिंग 11 धावांवर, तर वाशिंग्टन सुंदर एका धावेवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजरबानीने 2, तर सिपंदर रझा, रिचर्ड नागरवा व ब्रॅण्डन मावुता यांनी प्रत्येकी एक-एक विकेट बाद केले.