तीन फलंदाजांच्या शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने 586 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर अफगाणिस्ताननेही चोख प्रत्युत्तर देताना चौथ्या दिवसअखेर 3 बाद 513 अशी जबरदस्त मजल मारली आहे. रहमत शाहने कर्णधार हशमतुल्लाहबरोबर 364 धावांची विक्रमी भागी रचताना आपले पहिलेवहिले द्विशतक साकारले. त्याची आठ तासांची चिवट खेळी 424 चेंडूंत 23 चौकार आणि 3 षटकारांनिशी 234 धावांची खेळी केल्यानंतर थांबली. त्यानंतर हशमतुल्लाहनेही झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना फटकावत 179 धावांपर्यंत मजल मारली आहे. तसेच चौथ्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागी केली आहे. उद्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी हशमतुल्लाहही आपले द्विशतक साकारतो तर एकाच डावात दोन द्विशतकी खेळीचा पराक्रम अफगाणिस्तानी संघाकडून प्रथमच साकारला जाणार आहे. तसेच हशमतुल्लाहने तीन वर्षांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 200 धावा ठोकून आपले कसोटीतील पहिलेवहिले शतक साकारले होते.