लोकल मार्गावर ‘मिशन झीरो डेथ’, प्रवाशांचे अपघाती मृत्यू रोखण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या उपनगरी मार्गावर लोकलमधून पडून किंवा रुळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तथापि, हा मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (एमयूटीपी) चौथ्या टप्प्यात ‘झीरो डेथ’ मिशन हाती घेतले जाणार आहे. लोकलच्या गर्दीमुळे होणारे मृत्यू कसे रोखता येतील, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन जाळे भक्कम करण्याच्या हेतूने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) एमयूटीपीच्या चौथ्या टप्प्याची आखणी केली आहे. उपनगरी रेल्वेवर एकूण 115 स्थानके आहेत. सध्या ‘एमयूटीपी-3ए’ टप्प्यांतर्गत 17 रेल्वे स्थानकांवर गर्दीचे नियोजन, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध करणे या दृष्टिकोनातून कामे करण्यात येत आहेत. रेल्वेची मालकी असलेल्या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन प्लॅटफॉर्मवर एलिव्हेटेड डेक्सचे बांधकाम करीत आहोत. स्थानकात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सोयिस्कर ठरणारे एण्ट्री-एक्झिट पॉइंट उभारत आहोत, अशी माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली. या धर्तीवर आणखी स्थानकांचा विकास करण्यासाठी ‘एमयूटीपी-4’अंतर्गत अभ्यास केला जाणार आहे.

रेल्वे मार्गाच्या पूरप्रवण क्षेत्रात होल्डिंग पॉइंट

पावसाळय़ात रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. त्यात प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी रेल्वे मार्गावर असलेल्या पूरप्रवण क्षेत्रात ‘होल्डिंग पॉइंट’चे बांधकाम केले जाणार आहे. जेणेकरून मुसळधार पावसावेळी रुळ परिसरात साचलेले पाणी ‘होल्डिंग पॉइंट’मध्ये साठवून ठेवता येईल आणि समुद्राच्या लाटांचा मारा थांबल्यानंतर ते पाणी समुद्राच्या दिशेने सोडता येईल. ‘एमयूटीपी-4’ टप्प्यांतर्गत ‘होल्डिंग पॉइंट’चाही अभ्यास करण्यात येणार आहे.

एमयूटीपी-3टप्प्यांतर्गत या स्थानकांचा विकास

पश्चिम रेल्वे

खार, सांताक्रूझ, कांदिवली,

मीरा रोड, भाईंदर, वसई, नालासोपारा.

मध्य रेल्वे

घाटकोपर, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, नेरळ, कसारा,

हार्बर रेल्वे

जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द.

डेडलाइन खर्च

‘एमयूटीपी-3ए’ टप्प्यांतर्गत 17 स्थानकांचा विकास टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे. सर्वप्रथम खार स्थानकातील काम येत्या जूनपर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर कांदिवली, मीरा रोड, नेरळ व कसारा या चार स्थानकांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. उर्वरित दहा स्थानकांच्या कामासाठी डिसेंबर 2026 ची डेडलाइन निश्चित केली आहे. या प्रकल्पावर 1000 ते 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.