उस्ताद झाकीर हुसेन हे एक असं व्यक्तिमत्त्व, ज्याने वाद्याला प्रसिद्ध केलं, कलावंतांना प्रसिद्धी दिली. अगदी वाद्यं बनविणाऱया कारागीरांचंही भलं केलं. त्यांनी तबला वाद्याचा अमाप विस्तार, प्रसार केला. अनेकांना प्रेरित केले. लहान लहान मुले त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिकतात. त्यांच्यामुळेच अनेक तबला वादकांचे करीअरमध्ये चांगले चाललेय. इतकं प्रेरणादायी काम झाकीरभाईंनी केलंय. ते आता आठवणींमध्ये राहिलंय.
झाकीरभाई दरवर्षी त्यांच्या अब्बाजींची गुरुपौर्णिमा करतात. गेल्या जुलै महिन्यात त्या कार्यक्रमात सावनीचे म्हणजे माझ्या मुलीचे तबलावादन होते. सत्यजित आणि सावनी या दोघांना त्यांचे आशीर्वाद होते. आमच्या कुटुंबाशी, आमच्या कार्यपरिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ते आताच्या जुलै महिन्यापर्यंत मी त्यांचे वादन ऐकलेय. त्याच्यातील कॉमन फॅक्टर असा की, वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्यात जी ऊर्जा होती, ती वयाच्या 73 व्या वर्षीही होती. कला म्हटल्यावर ऊर्जा लागते. त्या ऊर्जेपासून दुसऱयाला प्रेरणा देणारे असे ते प्रेरणास्रोत होते.
हिंदुस्थानी संगीत हे परंपरेशी निगडित आहे. झाकीरभाई जेवढे परंपरेला चिकटून होते, तेवढे ते नवतेचा उदार दृष्टिकोन ठेवून होते. त्यामुळे तबला वाद्यातून म्हणजे परंपरेतून ते सारखी नवता पाहत होते आणि या नवतेतून त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढे प्रसिद्धी वलय असूनही ती व्यक्ती ‘डाऊन टू अर्थ’ होती. त्यांना कुठल्याही गोष्टीचा अभिनिवेश नव्हता. मी हे करतोय, मी हे केलं, असं त्यांचं कधीच नव्हतं. प्रत्येकाने त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे.
झाकीरभाईंनी प्रसिद्धी पचवली होती. प्रसिद्धी पचवण्यासाठी त्यांना कोणतेही श्रम पडले नाहीत. कारण ते नैसर्गिक होतं. त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ लोकांनी प्रसिद्धी पचवली असे म्हणता येणार नाही. हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होतं.
आम्ही दरवर्षी दोन-चारदा भेटायचो. त्यांच्या अनेक मैफली स्मरणात राहणाऱया आहेत. पुण्यामध्ये डिसेंबरमध्ये त्यांचे सोलो वादन असायचं. मी येणार हे त्यांना माहीत होतं. ते भेटल्यानंतर असं वाटायचं नाही की, एक वर्षाने भेटतोय.
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्यात जी ऊर्जा होती, ती वयाच्या 73 व्या वर्षीही होती. कला म्हटल्यावर ऊर्जा लागते. त्या ऊर्जेपासून दुसऱ्याला प्रेरणा देणारे असे ते प्रेरणास्रोत होते.