
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अखेर या चर्चेला ब्रेक लागला आहे. युजवेंद्र आणि धनश्रीला मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. तिथे त्यांची शेवटची कायदेशीर प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगितले आहे. युजुवेंद्र आणि धनश्री आज न्यायाधीशांसमोर हजर राहतील, त्यानंतर त्यांना त्यांचे अधिकृत घटस्फोट प्रमाणपत्र मिळेल, असे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, युजवेंद्र आणि धनश्रीने परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावरही दोघांमध्ये मतभेद आणि घटस्फोटाची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर दोघांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्ट देखील घटस्फोटाकडे इशारा देत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये धनश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्ट्रेस टू बी ब्लेस्ड… अशी पोस्ट धनश्रीने केली आहे. इतकचं नाही तर धनश्रीच्या या पोस्टवर युजवेंद्रने देखील स्टोरीवर एका पोस्ट शेअर करत त्या पोस्टमध्ये त्याने ‘देवाने माझं अनेकदा रक्षण केलं आहे…’, असं लिहिलं आहे.