उषा मित्तल इन्स्टिटय़ूटमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय, युवासेनेकडून एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे कारवाईची मागणी

उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर गेल्या एक वर्षापासून अन्याय होत आहे. या संस्थेतील स्थायी कर्मचाऱ्यांकडूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातत्याने नाहक त्रास दिला जात आहे. याप्रकरणी युवासेनेने एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर-शेठ, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे, राजन कोळंबेकर आणि युवासेना विस्तारक अजय व्हनोळे यांनी नुकतीच कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांची भेट घेतली. यावेळी विद्यापीठाशी संलग्नित उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील स्थायी कर्मचाऱ्याकडून अस्थायी कर्मचाऱ्यांना होणाऱ्या नाहक त्रासाची तक्रार कुलगुरूंकडे करण्यात आली. युवासेनेच्या वतीने या तक्रारीचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. तसेच या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणीही केली. याची दखल घेत कुलगुरू चक्रदेव यांनी प्राथमिक चौकशी करून गरज असल्यास तज्ञ समितीद्वारे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन युवासेनेला दिले.