जल्लोष, आवाज युवा सेनेचाच! सिनेट निवडणुकीत दहाही जागांवर दणदणीत विजय

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवा सेनेने दहापैकी दहा जागा जिंकल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरलेल्या युवासेनेच्या 10 शिलेदारांनी सिनेटवर दणदणीत विजय मिळविला. या विजयाने पदवीधर मतदारसंघात भगव्याचीच शान आणि वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले. हा विजय विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील विजयाची नांदी मानली जात आहे.

युवा सेनेच्या शिलेदारांनी भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडविला. सिनेटच्या मागील निवडणुकीतही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाची जादू चालली होती आणि युवा सेनेने दहाही जागांवर विजय पटकावला होता.

आदित्य ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत निकालावर प्रतिक्रीया दिली. सरकारने सिनेट निवडणुकीत अडथळे निर्माण केले. ते निवडणुका हरतील. म्हणूनच कदाचित ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही घेत नाहीत. सिनेट निवडणुकीत जे विजयी झाले, त्यांचे अभिनंदन. मतदारराजाने आम्हाला साथ दिली. निवडणुका थांबवण्यासाठी मिंधेकडून सातत्याने प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. हा निकाल सुरुवात आहे. असाच विजय महाविकास आघाडी प्राप्त करेल, असे सांगून आदित्य ठाकरे यांनी विरोधकांनाही टोला लगावला.