
युवासेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीईटी आणि नीटसाठी सराव परीक्षांचे आयोजन केले आहे. उद्या, शनिवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत या सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. पेपर्स सोडविल्यानंतर विद्यार्थ्यांना सोल्यूशन सेट https://yuvasenacet.com या संकेतस्थळावरून लगेचच घेता येणार आहे.
बारावीनंतर इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ व मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेशासाठी सीईटी आणि नीट या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी व त्यांना पेपर सोडवण्याचा अनुभव मिळण्यासाठी युवासेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सराव परीक्षांचे आयोजन केले आहे. यंदाचे हे सहावे पर्व असून संपूर्ण महाराष्ट्रातून 150 पेक्षा अधिक सेंटर्सवर या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना नोंदणीकरिता शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आतापर्यंत 27 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी थेट परीक्षा केंद्रावर जाऊन युवासेना पदाधिकाऱयांशी भेट घेऊन या सराव परीक्षेत सहभाग घेऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसून या संधीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.