
विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत मनमानी करणाऱ्या मुंबई विद्यापीठ प्रशासनाला युवासेनेच्या अधिसभा सदस्यांनी शनिवारी रात्री चांगलाच दणका दिला. विद्यापीठाच्या मनमानी कारभाराला वाचा फोडण्याकरिता युवासेना आणि बुक्टू या प्राध्यापक संघटनेचे 18 सिनेट सदस्य रात्रभर विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात बसून होते. प्रतीकात्मक ठिय्या आंदोलनाच्या या आक्रमक पावित्र्यामुळे विद्यापीठातील वातावरण ढवळून गेले आहे.
नियमांची पायमल्ली करून बेकायदेशीरपणे शनिवारचे सिनेटचे कामकाज रेटण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. नियमानुसार विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाचा मसुदा अभ्यासण्याकरिता व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना किमान सात दिवस आधी देणे आवश्यक आहे. जेणेकरून व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आवश्यक ती चर्चा करता येते, परंतु यंदा केवळ एक दिवस आधी समितीच्या सदस्यांना मसुदा देण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्पावर सखोल चर्चा होऊ शकली नाही. सिनेटच्या अजेंडय़ातही अर्थसंकल्पाचा उल्लेख नव्हता. विद्यापीठाच्या या मनमानी कारभाराविरोधात युवासेना आणि बुक्टूच्या सदस्यांनी एकत्र येत विद्यापीठाला धारेवर धरले.
कुलगुरूंकडून दिशाभूल
शिवाय अधिसभा सुरू असतानाही प्रश्न विचारणाऱया सदस्यांना कुलगुरूंकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. आधीच अधिसभेकरिता सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कुलगुरूंचा विशेषाधिकार देत उत्तरे देण्याचे टाळण्यात आल्याने सदस्यांचा राग होताच. त्यात सिनेटचे कामकाज मनमानी रेटण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांविरोधात दोन्ही संघटनांचे सदस्य आक्रमक झाले.
हा सर्व प्रकार सदस्यांच्या अधिकारांचा भंग करणारा असून विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेला बाधा आणणारा आहे. यावर तीव्र आक्षेप नोंदवत युवा सेनेच्या दहा आणि बुक्टूच्या आठ सदस्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत निषेध व्यक़्त केला. सर्व सदस्य सकाळी 7.30 पर्यंत दीक्षान्त सभागृहात ठिय्या देऊन बसले होते.
युवा सेनेचे प्रदीप सावंत यांच्यासमवेत मयुर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल शेठ-देवरूखकर, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, किसन सावंत, अल्पेश भोईर, परमात्मा यादव हे सिनेट सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलन मागे घेण्याचे प्रयत्न निष्फळ
आंदोलन मागे घ्यावे यासाठी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी सिनेट सदस्यांची भेट घेतली. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनीही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु सदस्यांनी दाद न देता आंदोलन सुरूच ठेवले.
राज्यपालांची भेट घेणार
राज्यपालांची भेट घेऊन विद्यापीठाच्या मनमानी कारभाराला वाचा फोडणार असल्याचे युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही यासंदर्भात निवेदन देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.