ॉमुंबई विद्यापीठ महाविद्यालय, आंतरमहाविद्यालय, विभागवार आंतरविद्यापीठ, राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करते. गुणी खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, याकरिता त्यांचा नेहमीचा भत्ता, स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यास उत्तम प्रवास व्यवस्था, सर्वोत्तम खेळांची साधने आणि चांगला कोच यांची आवश्यकता असते. या सर्व सुविधा खेळाडूंना पुरवा, अशी मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी खेळ विभागाच्या विद्यापीठ संचालकांकडे केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे संचालक (खेळ विभाग) डॉ. मनोज रेड्डी यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठ खेळ विभागात नवीन कायद्यानुसार झोनप्रमाणे होणाऱ्या स्पर्धा तसेच विद्यार्थी खेळाडूंना भेडसावणाऱया समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, विद्यापीठाने अत्याधुनिक यंत्रणा वापर करून ऍथलेटिक्समध्ये फोटो फिनिश यंत्रणा, तायक्वाँडो खेळात वापरण्यात येत असलेली चित्रीकरण यंत्रणा आणि त्याद्वारे लागणाऱया निकालामुळे खेळाडूंच्या शंका दूर होत असल्याने या प्रयत्नाचे स्वागत करून शक्य असेल तेवढ्य़ा खेळात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. निवड प्रक्रियेत एखाद्या खेळाडूवर अन्याय होतो आहे असे वाटत असेल तर त्या्ने योग्य शुल्क भरावे, त्याचे परीक्षण पुन्हा करण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे आश्वासन रेड्डी यांनी दिले.
विद्यापीठाच्या चारही झोनप्रमुखांची बैठक
खेळाच्या स्पर्धांच्या आणि त्यांच्या परीक्षांच्या तारखा यांची सांगड घातली जाते का? मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत विविध झोन आखले आहेत, त्या प्रत्येक झोनकरिता प्रमुख नियुक्त केला जातो. ती व्यक्ती तेवढय़ा क्षमतेची असते का, असे प्रश्न उपस्थित करून विद्यापीठाच्या चारही झोनचे प्रमुख आणि सर्व नवनिर्वाचित पदवीधर मतदारसंघाचे सिनेट सदस्य यांच्यासोबत लवकरच संयुक्त बैठक घेण्याची मागणी युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.