
आंतराराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा, कला स्पर्धांसाठी, शैक्षणिक उपक्रमांकरिता मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च विद्यापीठाने करावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
विद्यार्थी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता अन्य देशांत जातात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना प्रवासाचा व इतक खर्च आपल्या खिशातून करावा लागतो. अनेकदा पैसे नसल्याने होतकरू विद्यार्थ्यांना या स्पर्धांना मुकावे लागते. त्याऐवजी केवळ खर्च करायला पैसे आहेत म्हणून इतर विद्यार्थ्यांची निवड केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हा गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
केवळ पैसे नाहीत म्हणून स्पर्धेतील सहभागाला मुकलेल्या वर्तक महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांची कैफियत शिवसेना नेत, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आली. त्याची कैफियत ऐकल्यानंतर युवासेनेने अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता पुढाकार घ्यायचे ठरविले आहे.
युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च विद्यापीठाच्या त्या त्या विभागाने करावा, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध नसेल त्यांचा खर्च कुलगुरू निधीमधून करावा, अशी सूचना केली आहे. यासंबंधीचे निवेदन सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचडे, किसन सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साटम आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कारंडे यांना दिले आहे.