यूट्यूबरने उड्डाणपुलावरून उधळल्या नोटा; पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

लाइक्स आणि व्ह्यूज वाढावेत म्हणून यूटय़ूबर किंवा कंटेंट क्रिएटर्स वाट्टेल ते करताना दिसतात. अगदी जीवघेणा स्टंटदेखील करतात. असे प्रकार मग त्यांच्या चांगलेट अंगलट येतात. उत्तर प्रदेशमधील एका यूटय़ूबरने असाच संतापजनक प्रकार केला. त्यामुळे त्याला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. कानपूरमधील मोहम्मद जैद अन्सारी असे यूटय़ूबरचे नाव आहे. त्याने  उड्डाणपुलावर उभे राहून नोटांचा वर्षाव केला. नोटांचा पाऊस पाहून ते पैसे गोळा करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

 व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक तरुण उड्डाणपुलावर उभा राहून 200 रुपयांच्या नोटा उडवतोय. या नोटा उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर पडत आहेत आणि लोक त्या नोटा जमा करण्यासाठी एकच गर्दी करतायत.

आपला वाढदिवस संस्मरणीय व्हावा म्हणून यूटय़ूबरने असा प्रताप केला आणि  50 हजार रुपये उधळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यूटय़ूबर जैद अन्सारीचा शोध घेतला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे नोटा उधळणे कायद्याने गुन्हा आहे. अपघात होण्याची, लोकांमध्ये हाणामारी, चेंगराचेंगरी होण्याचीदेखील शक्यता असते. यामुळे मोठी दुर्घटनादेखील घडू शकते. कानपूर पोलिसांनी या घटनेची दखल घेत सदर आरोपीस ताब्यात घेतले.