मी घाबरलोय, पळालो नाही; लोक माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये रुग्ण बनून आले अन्… रणवीर अलाहाबादियाची पोस्ट चर्चेत

कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांच्या शरीरसंबंधांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. सोशल मीडियावर त्याला प्रचंड टोल करण्यात आले. सामान्य लोकांसह नेते, अभिनेते सर्वांनीच त्याच्यावर टीका केली. देशातील विविध भागांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रीय महिला आयोगानेही त्याला समन्स धाडलेले आहे.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये जज म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे रणवीरसोबत शोचा होस्ट समय रैना, अपूर्व मखिजा, आशिष चंचलानी आणि शोची टीम कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. प्रत्येकाची खार पोलीस ठाण्यात चौकशी केली जात आहे.

रणवीर अलाहाबादिया यालाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते, पण तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाला नाही. पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही तो चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या वर्सोवा येथील घरी गेले. तिथे त्याच्या घराला कुलूप होते, त्याचा फोन देखील सातत्याने बंद लागतोय. त्यामुळे तो फरार झाल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर यावरून तर्क-वितर्क लढवले जात असतानाच आता रणवीरने एक धक्कादायक पोस्ट करत आपण पळून गेलो नसून घाबरलो असल्याचे म्हटले आहे.

रणवीरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी आणि माझी संपूर्ण टीम पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करत आहोत. मी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करेन आणि चौकशीसाठी उपलब्ध राहीन. आई-वडिलांबाबतची माझी टिप्पणी असंवेदनशील आणि चुकीची होती. स्वत:मध्ये बदल करणे ही माझी नैतिक जबाबदारी असून मला खरोखर वाईट वाटत आहे.

लोक मला आणि माझ्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मला आणि माझ्या कुटुंबालाही ते हानी पोहोचवू इच्छितात. माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये लोक रुग्ण असल्याचे भासवून घुसत आहेत. मला खूप भीती वाटत असून काय करावे कळत नाहीय. मी पळून गेलेलो नाही. मला देशातील पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असेही रणवीरने पोस्टमध्ये नमूद केले आहे.