यूट्यूब कॉन्टेन्ट क्रिएटर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यूट्यूब आता अशा कॉन्टेन्ट क्रिएटर्सवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे जे, दिशाभूल करणारे टायटल किंवा क्लिकबेट थंबनेल वापरून व्हिडीओ अपलोड करतात. याबाबत स्वतः यूट्यूबनेच माहिती जाहीर केली आहे.
कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हिडिओच्या मजकुराशी जुळत नसलेल्या टायटल किंवा थंबनेल अपलोड करणाऱ्या कॉन्टेन्ट क्रिएटर्सवर कारवाई केली जाईल. ही कारवाई विशेषतः ब्रेकिंग न्यूज किंवा चालू घडामोडींशी संबंधित व्हिडीओंवर करण्यात येईल, असं कंपनीने म्हटलं आहे
थंबनेल व्हिडिओशी संबंधित असणे आवश्यक
YouTube ने म्हटले आहे की, सनसनाटी किंवा व्हिडीओशी संबंधित नसणारे टायटल आणि थंबनेल व्हिडीओ पाहणाऱ्यांची दिशाभूल करतात. यातच ब्रेकिंग न्यूज आणि चालू घडामोडींवर व्हिडिओ बनवणाऱ्या हिंदुस्थानी कॉन्टेन्ट क्रिएटर्सवर यूट्यूबची करडी नजर असणार आहे.
काय होऊ शकते कारवाई?
कारवाईबद्दल माहिती देताना, YouTube ने सांगितले की, जे क्रिएटर्स दिशाभूल करणारे टायटल किंवा थंबनेल बनवून व्हिडीओ अपलोड करतील, त्यांचे व्हिडीओ यूट्यूबवरून हटवले जातील. क्रिएटर्सला नियम समजण्यासाठी सर्वातआधी हे पाऊल उचलले जाणार आहे. यानंतर चॅनल ब्लॉकही केले जाऊ शकते.