किरकोळ कारणातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री जालन्यात घडली आहे. सैय्यद नदीम सैय्यद रहीम असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बाळासाहेब बोंबले अशी आरोपींची नावे आहेत. संशयीतांविरुद्ध कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखीनगर परिसरात ही घटना घडली. सैय्यद नदीम सैय्यद रहीम याचा मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने गळा चिरला तसेच छातीवर, पोटावर, डोक्यावर जबर घाव मारण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसेच मुख्य आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चंदनझीरा पोलीस, कदिम जालना पोलीस ठाण्याचे आधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात उपस्थित होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर जमाव शांत झाला.