
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता असतानाच विधानसभेबाहेर एक तरुण झाडावर चढल्याने गोंधळ उडाला. सेंद्रीय मॉलची संकल्पना असलेला बॅनर घेऊन हा तरुण झाडावर चढला आणि आंदोलन सुरू केले. यामुळे एकच खळबळ उडाली.
हातामध्ये तिरंगा, सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर घेऊन सकाळच्या सुमारास बीडच्या ईश्वर शिंदे नावाचा तरुण विधान भवनाबाहेरच्या झाडावर चढला. हे निदर्शनास येताच पोलिसांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी शिडी लावून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने खाली उतरण्यास नकार दिला. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता.
तरुण झाडावर चढल्याने तिथे बघ्यांचीही गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणाने नकार दिला. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारीही शिडीवरून झाडावर चढले आणि त्यांनी त्याला खाली उतरण्याची गळ घातली. मात्र लिखित स्वरुपात पत्र आणले तरच खाली उतरेल असा पवित्रा तरुणाने घेतला. अखेर त्याची मनधरणी करण्यासाठी भाजप आमदार अनुप अग्रवाल क्रेनने झाडाजवळ गेले. त्यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारीही होते. यानंतर तोडगा निघाला आणि तरुण खाली उतरला.
विधान भवनाच्या बाहेर असलेल्या झाडावर चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. pic.twitter.com/0iwPJTyHhB
— Saamana Online (@SaamanaOnline) March 26, 2025