कांदिवलीत स्टंटबाजी जिवावर बेतली, टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

दारूचे पेग रिचवत रिक्षात स्टंट करणे तरुणाला जिवावर बेतले आहे. रिक्षातून स्टंटबाजी करताना टेम्पोला धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. भूषण बांदेकर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नटराज शेट्टी या रिक्षाचालकविरोधात कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

भूषण हा टेम्पो चालवण्याचे काम करायचा. बुधवारी रात्री भूषण हा त्याच्या दोन मित्रांसोबत कांदिवलीच्या हिंदुस्थान नाका येथे पार्टीसाठी गेला होता. तेथे भूषणने दारू प्यायली होती. रिक्षातून जात असताना भूषण हा रिक्षाच्या बाहेर लटकून स्टंट करत होता. रिक्षा कांदिवलीच्या सागर मार्बल शॉप येथून जात असताना तेथे एक टेम्पो पार्क होता. त्या टेम्पोला भूषणची धडक बसली. त्यात तो जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच कांदिवली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी भूषणच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला. भूषण हा दारू प्यायल्यानंतर तो स्टंट करत होता. त्याला स्टंट करताना शेट्टीने रोखले नाही. रिक्षा चालवून त्याने टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाल्याने शेट्टीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी शेट्टीला अटक केली.