नाशिकमध्ये नायलॉन मांजाने तरुणाचा मृत्यू, पतंगोत्सवाला गालबोट; जिल्ह्यात सहा जखमी

जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर पूर्णपणे रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. या मांजाचा सर्रास वापर सुरूच राहिल्याने जिल्ह्यात तीन दिवसांत सहा जणांचे गळे चिरले गेले, तर नाशिकच्या पाथर्डी-वडनेर रस्त्यावर मंगळवारी सकाळी सोनू धोत्रे या तरुणाचा बळी गेला. तो गुजरातहून दुचाकीवरून येत असताना घरापासून काही अंतरावरच मांजाने घात केला. याप्रकरणी पोलीस अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.

देवळाली कॅम्पजवळील शिंगवे बहुला चारणवाडी येथील सोनू किसन धोत्रे (23) हा मंगळवारी गुजरातहून संक्रांतीनिमित्त दुचाकीवरून नाशिकला आला. सकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून वडनेर रस्त्याकडे जात असताना नायलॉन मांजामुळे गळा पूर्ण चिरला जाऊन तो जमिनीवर कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. त्याचे मामा, मावशी, इतर नातेवाईक व मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली.

आजारी आईशी भेट झालीच नाही
देवळाली कॅम्प भागातील चारणवाडी येथील सोनू धोत्रे हा गुजरातच्या वलसाड येथील महापालिकेत नोकरी करीत होता. मे महिन्यात त्याचे लग्न होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. संक्रांतीनिमित्त तो आजारी आई, भावासह मित्र परिवाराला भेटण्यासाठी गुजरातहून दुचाकीवरून येत असताना नायलॉन मांजाच्या रूपात काळाने गाठले आणि आई, भावाशी भेट घडलीच नाही.

येवल्यात दोन दिवसांत चार जखमी
येवला शहर व तालुक्यात पतंगोत्सवाची मोठी धूम असते. येथे दोन दिवसांत चौघेजण मांजामुळे जखमी झाले आहेत. कोटमगाव येथे पाच वर्षीय देवराज दीपक कोटमे याच्या गळय़ाला 13 टाके पडले. पिंपळखुटे येथे शुभम सजन पवार, तर अंदरसूल येथे दीपक राऊत जखमी झाले आहेत. 12 तारखेला हुडको कॉलनीत 30 वर्षीय सुमित भालेराव याची मांजामुळे पापणी कापली, तर पारेगाव येथून दुचाकीवरून येवल्याकडे येणाऱया 30 वर्षीय दत्तात्रेय जेजूरकर जखमी झाले.

विंचूरमध्ये युवकाचा गळा चिरला
निफाड तालुक्यातील विंचूर येथील पार्वती स्टील दुकानाजवळ सोमवारी सायंकाळी 16 वर्षीय रेहान शेख याचा गळा मांजाने चिरला. गळय़ाला गंभीर दुखापत होऊन डाव्या बाजूने तब्बल 41 टाके पडले आहेत. त्याच्यावर लासलगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतही बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत आहे. या विव्रेत्या व वापरकर्त्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जिह्यात जखमींची संख्या 30 वर
शहर व ग्रामीण पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री रोखण्यासाठी पावले उचलली. मात्र, छोटय़ा विक्रेत्यावर थातूरमातूर कारवाई केली. पोलिसांचा विक्रेत्यांना धाकच नसल्याने मांजा बाजारात आलाच आणि त्याने जीवितास धोका निर्माण करीत पंधरा दिवसांत जिह्यात 30 जणांना जखमी केले. यात येवल्यात 14, सिन्नरला 10, मालेगावला 1, लासलगावला 2 अशी ही संख्या आहे. नाशिक शहरात तीन जखमी झाले, तर एकाचा या मांजाने बळी घेतला.

मुंबईत आतापर्यंत 19 गुन्हे दाखल

मकर संक्रांतनिमित्त पंतग उडविण्याचा आनंद लुटला जातो. परंतु पतंग उडविण्यासाठी घातक असणाऱया नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याने पोलिसांनी त्याविरोधात धडक कारवाई सुरू केली होती. त्यानुसार तीन दिवसांत नायलॉन मांजराची विक्री करणाऱयांविरोधात 19 गुह्यांची नोंद करून जवळपास 35 हजारांचा नायलॉन मांजा व अन्य साहित्य जप्त केले आहे. पतंग उडविण्यासाठी सर्रास नायलॉन मांजाचा वापर केला जातो. पण नायलॉन मांजामुळे नागरिकांना गंभीर दुखापत होत असल्याच्या घटना विविध ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र तरी काही विव्रेते नायलॉन मांजा विक्री करतात. अशा विव्रेत्यांवर वॉच ठेवून मुंबई पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत 19 गुह्यांची नोंद केली. तसेच 19 जणांना अटकेची तसेच नोटिस बजावण्याची कारवाई करण्यात आली.

पुण्यासह संभाजीनगरमध्ये दुचाकीस्वारांना मांजाचा फास
नायलॉन मांजावर बंदी असतानादेखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. मांजाचा फास बसून पुण्यातील ज्येष्ठ दुचाकीस्वार आणि छत्रपती संभाजीनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला मांजाने कापल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पुलावर घडली. यामुळे ज्येष्ठाच्या गालाला आणि अंगठय़ाला गंभीर दुखापत झाली आहे. देवराम दत्तात्रय कामठे (67, रा. पुरंदर, सध्या रा. शिवाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी
दुचाकीवरून कामावर जात असताना पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे यांच्या गळ्याला मांजा लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर परिसरात घडली. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.