
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू- कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना साताऱ्यातील वाई तालुक्यातील एका माथेफिरू तरुणाने या हत्याकांडाच्या समर्थनार्थ पाकिस्तानचा ध्वज स्टेट्सला ठेवून हिंदुस्थानाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. याप्रकरणी वाई पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
शुभम दशरथ कांबळे (वय 23, रा. जांभळी. सध्या रा. नावेचीवाडी गंगापुरी, ता. वाई) असे माथेफिरूचे नाव आहे. स्टेट्स ठेवल्याचे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शुभमला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पहलगामच्या घटनेमुळे देशभरातील वातावरण संतप्त झाले असतानाच शुभम कांबळे या युवकाने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ स्टेट्स ठेवले. तसेच या पोस्टमध्ये त्याने हिंदुस्थानीयांच्या भावना दुखावतील, असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला. हा स्टेट्स व्हायरल झाल्यानंतर पश्चिम भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. तसेच याबाबत संकेत सुरेश चिकणे यांनी फिर्याद दिली. यानंतर स्टेट्सची खातरजमा करून वाई पोलिसांनी शुभम कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
शुभम हा मूळचा जांभळीचा असला तरी तो वाईत गंगापूर येथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुभमला पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर सामाजिक भावना दुखावल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.