मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर अभिनेता सलमान खान याला आधी धमकीचा संदेश आला. मग त्याच क्रमांकावरून माफीचा संदेश पाठविल्याप्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील एका 24 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे समजते.
हुसैन असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून तो झारखंडच्या जमशेदपूरमधील रहिवासी असल्याचे समजते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप मदत क्रमांकावर सलमानच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. त्यात लॉरेन्स बिष्णोईशी असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षाही वाईट होईल, असा इशारा दिला होता. याप्रकरणी 17 ऑक्टोबरला वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पुन्हा त्याच क्रमांकावरून मुंबई वाहतूक पोलिसांना दुसरा संदेश आला. त्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली होती. हा संदेश चुकून पाठवला असून त्याबद्दल संदेशात खेद व्यक्त केला होता. संदेश पाठवणारा झारखंडमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी तेथे धाव घेतली आणि एकाला चौकशीला ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.