
उच्च शिक्षणासाठी कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले आहे.
उच्च शिक्षण घेणारी तरुणी कॉलेजचा फॉर्म भरण्याकरीता रत्नागिरीतून खेडकडे निघाली होती. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पहाटे सुटणाऱ्या रत्नागिरी – दिवा पॅसेंजर गाडीत ती बसली होती. यावेळी पाठीमागून एका अनोळखी तरुणाने तिची मान आवळली व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिथून धूम ठोकली. नंतर या तरुणीने स्वतःला सावरत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ट्रेनच्या दरवाजातून खाली उडी मारली व दगडफेक करू लागला. अंधाराचा फायदा घेत तो तरुण पळून गेला.
या घडलेल्या प्रकारमुळे घाबरलेल्या तरुणीने रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने सर्व घटना पोलीस अधिकारी सतीश विधाते यांच्या कानावर घातली. विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच रेल्वे पोलिसांनी सूत्र हलविली आणि त्या तरुणाचा माग काढण्यास सुरवात केली. दोन तासाच्या आत त्या संशयित तरुणाला रेल्वे पोलीस आणि चिपळूण पोलिसांच्या संयुक्त टीमने चिपळूण येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर या तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुढील तपास पोलीस करत आहेत. रत्नागिरी सारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.