मरीन ड्राइव्हच्या समुद्रात तरुणी बुडाली; कामाला जाते सांगून घराबाहेर पडली

ऑफिसला जाते असे सांगून ती नेहमीप्रमाणे आज सकाळी घराबाहेर पडली. पण कामाला न जाता तिने मरीन ड्राइव्ह गाठले. कठडय़ावर तिची पर्स होती, परंतु ती समुद्रात बुडत होती. दुर्दैवाने त्या तरुणीचा मृत्यू झाला.

ममता कदम (23) असे त्या तरुणीचे नाव होते. अंधेरी येथे राहणारी ममता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून कामाला होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. पण कामावर न जाता ती मरीन ड्राइव्ह येथे गेली. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तेथे एका व्यक्तीला ममता समुद्रात बुडताना दिसली. त्याने लगेच 100 नंबरवर संपर्क साधून त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन तिला बाहेर काढले. तिला जी.टी. इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी दाखल पूर्व मृत घोषित केले. ममताने कठडय़ावर ठेवलेल्या बॅगमध्ये लॅपटॉप, मोबाईल, मेकअपचे सामान होते. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान ममताने आत्महत्या केली असावी, असा संशयदेखील व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.