तरुणाने 25 लाखांच्या पगाराची नोकरी नाकारली; पठ्ठ्या म्हणतोय, 87 टक्के वाढ ही पुरेशी नाहीय

नोकरीसाठी कोणतीही कंपनी बदलली तर पगारात 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा असते, परंतु बंगळुरूमध्ये एका तरुणाला कंपनीने तब्बल 87 टक्के पगारवाढ देण्याची ऑफर दिली, परंतु ही वाढ कमी आहे, असे सांगून तरुणाने ही नोकरी नाकारली. नोकरी नाकारल्यानंतर या तरुणाने सोशल मीडिया रेडीटवर एक पोस्ट शेअर करून लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

या तरुणाच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा तरुण सध्या ज्या कंपनीत काम करतोय त्या ठिकाणी त्याचा पगार वार्षिक 16 लाख रुपये इतका आहे. नव्या कंपनीत अर्ज केल्यानंतर या तरुणाला कंपनीने 25 लाख वार्षिक पॅकेज ऑफर केले, परंतु तरुणाला कंपनीचे पॅकेज आवडले नाही. 87 टक्के वाढ ही कमी आहे, असे तरुणाने म्हटले. आपल्या पोस्टमधून तरुणाने एचआरला लक्ष्य केले. एचआरने जे लेटर दिले त्यात बोनसचा उल्लेख नव्हता. नव्या जॉइनिंगचे पत्र ई-मेलवर पाठवण्यास कंपनीने नकार दिला. या कंपनीत प्रत्येक जण एकसारखे आहेत. त्यांनी मला कंपनीवर विश्वास ठेवण्यास सांगितले, परंतु कंपनीच्या या वागण्यामुळे मी नाराज आहे, असे तरुणाने म्हटले.