कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याचे अर्धनग्न व्हिडीओ काढून त्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्याची संतापजनक घटना मालाडच्या मालवणी येथे घडली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अग्नल एस. गोम्स आणि आदित्य राजश्री बडेकर या दोघांना अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार तरुण हा मालाड येथे राहत असून तो एका कॉलसेंटरमध्ये काम करतो. तेथे पूर्वी गोम्स हा काम करत होता. काही कारणास्तव एप्रिल महिन्यात गोम्सला कामावरून काढून टाकले होते. तक्रारदार याच्यामुळे कामावरून काढून टाकले असा गोम्सचा गैरसमज झाला होता. त्यावरून त्यांच्यात वाददेखील झाला होता. तीन दिवसांपूर्वी तक्रारदार हा रात्री ड्युटी संपवून घरी आला. तेव्हा तेथे एक जण आला. त्याने तक्रारदार याला नाव विचारले. त्यानंतर तेथे गोम्स आला. गोम्सने तक्रारदार याला मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर तक्रारदार याला स्कुटीवर बसवून गोरेगाव येथे नेले. गोम्सने तक्रारदार याला एटीएममध्ये नेऊन खात्यातील रकमेचा तपशील तपासला. गोम्सने लोन अॅप्स डाऊनलोड करून खात्यातून 6 लाख 21 हजार रुपये काढल्याचे उघड झाले. घडल्या प्रकरणी तरुणाने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासासाठी पथके तयार केली. पोलिसांनी तपास करून गोम्स आणि आदित्यला ताब्यात घेतले.