टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना; विंडीजमध्ये अडकलेल्या तीन खेळाडूंच्या जागेवर बदली खेळाडूंना संधी

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद पटकाविल्यानंतर लगेचच होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ मंगळवारी सकाळी मुंबईहून रवाना झाला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील नव्या दमाचा हिंदुस्थानी संघ 6 जूनपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यावर पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपची ‘रन’धुमाळी सुरू असतानाच ‘बीसीसीआय’ने नव्या चेहऱ्यांना संधी देत झिम्बाब्वे दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघ जाहीर केला होता. वर्ल्ड कपच्या स्वारीवर गेलेल्या खेळाडूंपैकी रिंपू सिंह, आवेश खान, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या पाच खेळाडूंचीही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली होती. रिंपू सिंह व आवेश खान वर्ल्ड कपच्या गटफेरीनंतर मायदेशी परतले, मात्र बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे वेस्ट इंडीजमधून अडपून पडल्याने टीम इंडियाला नियोजित वेळेत मायदेशी परतता आले नाही. त्यामुळे सॅमसन, दुबे व जैस्वाल या तीन खेळाडूंच्या जागेवर साई सुदर्शन, जीतेश शर्मा आणि हर्षित राणा या नव्या खेळाडूंचा संघात समावेश करावा लागला. नव्याने निवड झालेले हे तीन खेळाडूही टीम इंडियासोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेले आहेत.

पहिल्या दोन सामन्यांसाठीच तीन खेळाडूंची निवड

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पहिल्या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीच साई सुदर्शन, जीतेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांची जागा घेतील. वर्ल्ड कप संघाबरोबर असलेले हे तीन खेळाडू प्रथम संपूर्ण संघासह मायदेशात येतील. त्यानंतर ते झिम्बाब्वेच्या स्वारीवर रवाना होतील.

ईशान किशनला डावलले

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ‘बीसीसीआय’ने टीम इंडियात नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनुभवी ईशान किशनला डावलले. यशस्वी जैस्वाल किंवा संजू सॅमसनच्या जागेवर ईशानची निवड व्हायला हवी होती, मात्र त्याकडे ‘बीसीसीआय’ने साफ दुर्लक्ष केले. ‘बीसीसीआय’ने ईशानला फेब्रुवारी-मार्चमध्ये देशाअंतर्गत स्पर्धेत खेळण्याची सूचना केली होती. मात्र त्याने तसे न करता ‘आयपीएल’मध्ये सहभाग घेतला. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई म्हणून ‘बीसीसीआय’ने ईशानला वार्षिक करातून वगळले. आयपीएलमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यामुळे ईशान किशन सध्या ‘बीसीसीआय’च्या रडारवर आहे. त्यामुळे सध्या तरी त्याची हिंदुस्थानी संघात निवड होणे अवघड वाटत आहे.

पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी हिंदुस्थानी संघ  

शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंपू सिंह, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश पुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जीतेश शर्मा (यष्टिरक्षक), हर्षित राणा.