आनंदवनात तरुणीची हत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या आनंदवन येथे 25 वर्षीय तरुणीचा खून करण्यात आलाय. आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटस्फोटित तरुणी कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती. तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात. काल ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. काल रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घराच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.