पाण्याचा लोंढा अचानक वाढल्याने खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गेलेले पाच पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली आहे. मात्र यातील एक तरुणी वाहून गेल्याने तिचा बुडून मृत्यू झाला आहे. स्वप्नाली क्षीरसागर (22) असे मृत तरुणीचे नाव असून शहरातील पेम्पो कंपनीच्या पुलाखाली तिचा मृतदेह सापडला आहे. अपघातग्रस्त मदत टीमच्या सदस्यांनी प्रयत्नांची शर्थ करून सायंकाळी उशिरा या मुलीचा मृतदेह शोधून काढला.
परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात धुडगूस घातला आहे. त्यामुळे नदी, नाले पुन्हा एकदा तुडुंब भरून वाहू लागल्याने पर्यटकांची पावले हॉटस्पॉटवर वळू लागली आहेत. खोपोलीतील झेनिथ ठाकूरवाडीजवळील कृष्णा व्हॅली सोसायटीत राहणारे क्षीरसागर कुटुंबातील पाच जणही परतीच्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधब्यावर सायंकाळी चारच्या सुमारास गेले होते. सर्वजण पाण्यात बसून आनंद लुटत असतानाच बोरघाटात झालेल्या तुफान पावसामुळे नदीचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा हा लोंढा काही क्षणात आल्याने सर्वांचीच धांदल उडाली. क्षीरसागर कुटुंबीय एकमेकांचा हात पकडून पाण्यातून बाहेर निघण्यासाठी धडपड करू लागले. स्वप्नालीचा भाऊ आणि घरातील अन्य दोन महिलांसह एक जण असे चौघे नदीच्या प्रवाहातून सुखरूपपणे बाहेर पडले, परंतु स्वप्नाली पाण्याच्या लोंढ्याबरोबर काही समजण्याच्या आतच वाहन गेली.
मदतीसाठी टाहो.. आमच्या मुलीला वाचवा हो !
पाण्याचा प्रवाह वाढताच क्षीरसागर कुटुंबीय एकमेकांचे हात पकडून एकामागोमाग एक बाहेर पडले, पण स्वप्नाली डोळ्यांदेखत वाहून जात असल्याचे पाहून सर्वांनीच हंबरडा फोडला. आमच्या मुलीला वाचवा हो, असा एकच टाहो क्षीरसागर कुटुंबीय फोडत होते. मात्र काही क्षणात स्वप्नाली दिसेनाशी झाली. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस व अपघातग्रस्त मदत टीम घटनास्थळावर दाखल झाली. त्यांनी सर्च ऑपरेशन राबवले, परंतु मुसळधार पावसाने पाताळगंगा नदीचे पाणी गढूळ झाल्याने शोधमोहिमेत अडथळे येत होते. या टीमने विहारी, रहाटवडे, पेम्पो, आयओसी, डीपी, शिळफाटा या भागात शोधाशोध केली. त्याचवेळी योगेश औटी, सुनील पुरी या तरुणांना स्वप्नालीचा मृतदेह पेम्पो पुलाखाली आढळून आला. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.