कंपनीच्या अतिकामामुळे 26 वर्षीय मुलीचा मृत्यू, आईचा कंपनी प्रशासनावर आरोप

येरवड्यातील इ वाय कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय मुलीचा अतिकामामुळे नुकताच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कंपनीत रुजू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांत तिला प्राण गमवावे लागले. कामाच्या तणावाने लेकीचा बळी घेतल्याचा आरोप मुलीच्या आईने कंपनी प्रशासनावर केला आहे. अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायल (26, रा. केरळ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कंपनी प्रशासनासोबत संपर्क होऊ शकला नाही.

केरळमधील अ‍ॅना पेरायल 2023 मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाली. मार्च 2024 मध्ये पुण्यातील इ वाय कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून ती रुजू झाली. पहिलीच नोकरी असल्याने, तिने कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यामुळे तिच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. कंपनीने मुलीची मान मोडेपर्यंत कामाचा भार टाकल्याने तिला जीव गमवावा लागला आहे. याबाबत पेरायलची आई अनिता ऑगस्टिन यांनी कंपनीचे अधिकारी राजीव मेमाणी यांना ई-मेल पाठविला आहे.

रात्री उशिरापर्यंत काम अन् सुट्टी नाही

माझी मुलगी रात्री उशिरापर्यंत काम करीत होती. तिला वीकेंडलाही सुट्टी न घेता काम करावे लागत होते. तिने या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल सांगितले होते. तिची मॅनेजर सतत कामासाठी अ‍ॅनाच्या मागे तगादा लावत होती. त्यामुळे तिने रात्री उशिरापर्यंत काम केले आहे. तिला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता. अ‍ॅनाच्या बॉस आणि सहायक व्यवस्थापकाने तिला दुसऱ्या दिवशी सकाळच्या डेडलाइनसह रात्री एक काम सोपवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते काम पूर्ण करण्यास सांगितले होते, अशी माहिती अ‍ॅनाच्या आईने दिली आहे.

अतिकामामुळे मुलीचा जीव गेल्याचा आईचा आरोप

अतिकामामुळे मुलीच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप अ‍ॅनाच्या आईने केला. तिने याबाबत मेलद्वारे कंपनीला मानवी हक्क मूल्ये आणि तिच्या मुलीने अनुभवलेली वास्तविकता याविषयी विचारणा केली आहे.

मुलीच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून, याप्रकरणी तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, असे कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.