
राज्यात विकासात योगदान देण्याची तुम्हाला पूर्ण संधी दिली जाईल; परंतु तुम्ही केवळ अल्पसंख्याक आहात म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. रस्त्यावर नमाज पढाल किंवा कुठलेही अवैध काम कराल तर बुलडोझर कारवाईला तयार राहा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ईदच्या दुसऱया दिवशी मुस्लिमांना दिला.
एका मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. डीजेची उंची कमी करा, असे आम्ही कावड यात्रेतही सांगितले. जे करत नाहीत त्यांच्यावर आम्ही सक्ती करतो. कायदा सगळय़ांसाठी सारखाच असतो. ईदच्या दिवशी तुम्ही तासन्तास नमाज पढण्याच्या नावाखाली रस्ता रोखून ठेवणार का? नमाज पढण्यासाठीची जागा इदगाह किंवा मशीद असू शकते. रस्ता नाही, असे आदित्यनाथ म्हणाले.
केंद्रीय नेत्यांशी काही मतभेद आहेत का असा सवाल केला असता पक्षामुळेच मी इथे बसलो आहे. केंद्रीय नेत्यांसोबत मतभेद असते तर मी इथे बसलो असतो का? असा सवाल योगींनी केला.
मुस्लिमांनी हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिकावी
मेरठमध्ये रस्त्यावर नमाज पढण्यासाठी मनाई आदेश काढण्यात आले. याचे समर्थन करताना मुस्लिमांनी हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिकायला हवी असे योगी म्हणाले. प्रयागराजमध्ये महापुंभमेळय़ासाठी 66 कोटी लोक आले होते. कुठेही लुटमार, हल्ले, छेडछाड, तोडपह्ड, अपहरण असले प्रकार झाले नाहीत. ही धार्मिक शिस्त… भाविक श्रद्धेने आले, महास्नान केले आणि आपापल्या घरी परतले असे योगी म्हणाले.
मी पूर्णवेळ राजकारणी नाही
मी पूर्णवेळ राजकारणी नाही. प्रत्यक्षात योगी आहे. जोपर्यंत पदावर असेन तोपर्यंत राज्यातील जनतेची सेवा करेन. पण, यासाठीही काही कालमर्यादा आहे, असे योगी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही आवडता, नरेंद्र मोदींना आवडता, या देशातील एका मोठय़ा वर्गाला तुम्हाला एक ना एक दिवस पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. यावर तुमचे काय मत आहे, असा सवाल योगींना मुलाखतीत विचारण्यात आला होता.
वक्फ बोर्डाने कुणाचे कल्याण केले आहे का?
वक्फ बोर्डावरही योगींनी टीका केली. वक्फ बोर्डाने कुणाचे किंवा मुस्लिमांचे कल्याण केले आहे का, असा सवाल योगींनी केला. वक्फ बोर्ड स्वार्थी असून कुठल्याही सरकारी जमिनीवर कब्जा करण्याचे माध्यम बनला आहे. त्यामुळे सुधारणा ही काळाची गरज आहे, असे सांगत योगींनी वक्फ सुधारणा विधेयकाचे समर्थन केले. दरम्यान, उद्या लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केले जाणार आहे.