सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेजवळील अतिदुर्गम भागात पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर येणूबाई धूम यांनी 70 वर्षांत तीनशेहून अधिक मातांची सुखरूप बाळंतपणं केली. आपल्या प्रेमळ स्पर्शाने माता आणि नवजात बालकांना जणू जगण्याचा मंत्रच दिला. येणूबाई यांचे बुधवारी 1 जानेवारीला नव्वदाव्या वर्षी निधन झाल्याने परिसरावरून मायेचे छत्र हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
अतिदुर्गम पिंपळसोंड येथील येणूबाई नानू धूम या जवळील गावांमध्ये आजी म्हणून परिचित होत्या. या भागात सुईणीला सुयेरीन असे म्हटले जाते. साधारण वीस वर्षांपूर्वी खेड्या-पाड्यांवर गावातील ज्येष्ठ महिलाच सुईण म्हणून काम करायच्या. गावातील बहुतांश महिलांची बाळंतपणं अशीच व्हायची. याचप्रकारे येणूबाई यांनी ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता मैलोन्मैल चालत जाऊन माता, बालकांची सेवा केली आहे. घाबरलेल्या महिलेला धीर देत, अगदी स्पर्शानेही गर्भातील बाळ सुखरूप असल्याचे त्या सांगत. रात्रभर जागे राहून सुखरूपपणे जन्मलेल्या नवजात बाळाचे त्या जगात स्वागत करीत. मातेलाही मायेने आधार देत. तब्बल 70 वर्षांत त्यांनी तीनशेहून अधिक महिलांची बाळंतपणं केली आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत त्या कार्यरत राहिल्या.