‘त्या’ शिक्षिकेच्या कुटुंबियांना मिळाला सोशल मीडियावरुन मदतीचा हात

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ येथील मनिषा घोडके या शिक्षिकेचा चार दिवसांपूर्वी दुचाकीच्या चाकात पदर अडकून मृत्यू झाला होता. मात्र तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील मुख्याध्यापिका सुनिता मडावी यांनी सोशल मीडियावरुन मनीषा यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आणि अवघ्या चार दिवसात साडेपाच लाख रुपये जमा झाले.

आता ही रक्कम मनीषा यांचे पती आणि त्यांच्या तीन मुलांच्या उपयोगी पडणार आहेत. सुनीता मडावी यांनी या सोशल मीडियाद्वारे सृजनशीलपणे आणि सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीची घट्ट वीण विणली आहे हे अतिशय स्पृहणीय आहे.

मनिषा घोडके यांचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. शिक्षिकेची घरची परिस्थिती बेताची आहे. गरिबीवर मात करीत अपार अभ्यासाने त्यांना नोकरी मिळाली होती. सर्व स्वप्ने पूर्ण होणार या आनंदात असताना अचानक काळाने घात केला. नव्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट घेऊन निघालेल्या या शिक्षिकेचा दुचाकीच्या चाकात पदर अडकून चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पती एका दुकानात नोकरी करतात. पवित्र पोर्टलद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील कोरटा येथे जिल्हा परिषद शाळेत त्यांची नुकतीच निवड झाली होती. त्यादिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. जवळ पैसे नसल्याने नातेवाईकांकडून विद्यार्थ्यांना मुलीच्या वाढदिवसानिमित्य चॉकलेट वाटण्यासाठी फोन पे वरून पैसे मागविले आणि शाळेत जात असतानाच नेमकं हा अपघात झाला . नोकरीवरचा हा त्यांचा फक्त तिसरा दिवस होता. पहिला पगार सुद्धा त्यांच्या नशिबात नव्हता .