खराब रस्त्याच्या निषेधार्थ तरुणाचे हटके आंदोलन, रस्त्याच्या खड्ड्यात झोपून नोंदवला निषेध

>> प्रसाद नायगावकर

रस्त्यांच्या कामात सध्या प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. एखादा रस्ता नव्याने बनवला जातो आणि काही दिवसात या रस्त्याची दुर्दशा होते. असच काहीसं चित्र यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील भोजला मार्गाचे झाले आहे . या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

पुसद ते भोजला मार्गावरील रस्ता अगदी काही दिवसांपूर्वी बनविण्यात आला. या रस्त्याचे काम सुरू असताना लगतच्या गावकऱ्यांनी निकृष्ट कामाबद्दल वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली असून याकडे शासनाने आणि प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे .रस्त्यावर मोठे मोठे खड्डे होऊन या मार्गाचा स्विमिंग पूल बनला असे म्हंटले तर काही वावगे नाही. हेच रस्त्यावरचे हे मोठमोठे खड्डे आता अपघाताला आमंत्रण देत आहे.

पुसद तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांना वैतागून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी हटके आंदोलन केले आहे. नवाज अली यांनी शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात झोपून आणि पोहून अनोखे आंदोलन केलेय

पुसद तालुक्यातील अनेक रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे महिला, शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. सर्वसामान्य जनता गेली कित्येक वर्षे दुरावस्थेत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच नाहक त्रास सहन करीत आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामामागे कुणाचा आशिर्वाद आहे, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे. अन्यथा यापुढे मोठे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला.