ट्रक ड्रायव्हर बनलेला नक्षली नेता दिलीप महतोला पकडले, यवतमाळमध्ये मोठी कारवाई

गेली 23 वर्षे ट्रक ड्रायव्हर बनून पोलिसांना गुंगारा देणारा झारखंडमधील नक्षली नेता दिलीप महतो (47) याला यवतमाळ पोलिसांनी अखेर अटक केली. त्याच्या अटकेमुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिलीप याने खोटे आधार कार्ड आणि वाहनचालक परवाना बनवला होता.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांत नक्षलविरोधी मोहिमेत अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यामुळे नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता गेली 23 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा नक्षली नेता दिलीप महतो हाती लागल्यामुळे नक्षलवाद्यांच्या अनेक कारवायांमागील गुप्त घडामोडी उघड होणार आहेत. दिलीप याने खोटे आधार कार्ड आणि वाहनचालक परवाना बनवला होता. यवतमाळमधील एका स्टोन क्रशर कंपनीत तो ट्रकचालक म्हणून कामाला होता. पोलिसांना त्याचा सुगावा लागताच पोलिसांनी दीड महिना त्याच्यावर पाळत ठेवली आणि चार दिवसांपूर्वी तो उमरी येथील एका स्टोन व्रेशर परिसरात आल्याची माहिती मिळताच त्याला अटक केली.

हल्ले, खंडणीचे अनेक गुन्हे

दिलीप हा 1993 मध्ये झारखंडमधील नक्षली गटात भरती झाला. 1997 मध्ये ‘भितीया दलम’चा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली. सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची नासधूस अशा अनेक हिंसक कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. झारखंडमध्ये त्याच्याविरोधात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मृत व्यक्तीच्या नावाने बनवले आधार कार्ड

दिलीप हा नक्षली कारवायांत सक्रिय असताना आर्थिक अपहारामुळे अडचणीत आला. त्यामुळे आपल्याच लोकांकडून ठार मारले जाऊ, या भीतीने तो काही महिने मुंबईत राहिला आणि त्यानंतर तो यवतमाळमध्ये राहू लागला, असे म्हटले जात आहे. यवतमाळमधील लकडगंज परिसरात मृत व्यक्तीच्या आधार कार्डवर स्वतःचे छायाचित्र लावून त्याने ओळखपत्र तयार केले. याच पद्धतीने त्याने ट्रकचा परवाना मिळवला. पोलीस सर्व माहितीची शहानिशा करत आहेत.