>>प्रसाद नायगावकर
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती सुरू आहे. यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि पर जिल्ह्यातूनही असंख्य उमेदवार आले आहेत. या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी कंबर कसली आहे.
जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या 66 जागांसाठी तब्बल आठ हजार 894 अर्ज दाखल झाले आहेत. शहरातील गोदणी मार्गावरील नेहरू क्रीडा संकुलात सकाळी साडेचार वाजल्यापासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, उंची, धावण्याची चाचणी होत आहे. त्यानंतर पोलीस वाहनातून उमेदवारांना पोलीस कवायत मैदानावर (हेलीपॅड) येथे गोळा फेक चाचणीकरीता घेऊन जात आहेत. उमेदवारांमध्ये बहुसंख्य उमेदवार हे परगावाहून आले आहेत. कोणतीही मोठी भरती असली की उमेदवारांच्या गैरसोयींबद्दल अनेक बातम्या समाजमाध्यमांवर फिरत राहतात. अशा भरतीमध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रात्र हमखास बस स्टॅन्ड किंवा मैदानाच्या आजूबाजूला उघड्यावर आणि डासांच्या सानिध्यात काढावी लागते. तसेच त्यांची आंघोळ आणि शौचाला जाण्याची मोठी गैरसोय होते. बहुतांश उमेदवार हे सामान्य किंवा अतिसामान्य घरातील असतात. आर्थिक अडचणींमुळे ते एखादी घरगुती खानावळ शोधतात किंवा वडापाव किंवा मिसळ खाऊन दिवस भागवितात. अपुरी झोप, खाण्याचे झालेले हाल यामुळे त्यांच्या शारीरिक चाचणीवर परिणाम होतो.
भावी पोलिसांच्या याच समस्येवर यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेत तोडगा काढला असून या उमेदवारांची संपूर्ण व्यवस्था केली आहे. अशा उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी सकाळी वेळेत पोहोचता यावे तसेच मुक्कामी असणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे गंगाकाशी मंगल कार्यालय, लोहारा चौक, यवतमाळ येथे मोफत निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी सकाळी वेळेत पोहोचता यावे म्हणून मोफत वाहनाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. महिला उमेदवारांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून त्यांच्या मदत आणि संरक्षणा करीता दोन महिला पोलीस शिपायांना तैनात करण्यात आल्या आहेत. काही सामाजिक संघटनेच्या मदतीने तसेच पोलीस भरती करिता आलेल्या उमेदवारांची भरतीमध्ये सकाळच्या सत्राकरिता पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ येथे जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. भावी पोलिसांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी चोख व्यवस्था केली आहे. उमेदवारांनी निर्विघ्नपणे आपली परीक्षा द्यावी आणि आपल्या उत्कुष्ट कामगिरीने नोकरी पदरात पाडून घ्यावी, हीच आमच्या दलाची इच्छा असल्याचे मनोगत पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी व्यक्त केले आहे .