Yavatmal News : नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम, आता प्रभागांमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

>>प्रसाद नायगावकर

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. सध्या सर्व जिल्हा परिषद व नगरपालिका या प्रशासनाच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर नोकरशाही प्रभावी झाल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक विकास कामे रखडलेली आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी पुढाकार घेत एक अनोखी संकल्पना राबविली आहे.

सन 2020 पासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींची पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकारी अधिकारी हे थेट स्थानिक जनतेला उत्तरदायी नसतात, तसेच ते सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन जनप्रतिनिधींकडे जातो. पण निवडणूक न झाल्यामुळे विकासाची कामे रखडलेली आहेत. यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, मान्सूनपूर्व कामांची तयारी व्हावी या दृष्टीने यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी सर्वपक्षीय पूर्व नगरसेवकांना बोलावून घेतले होते. मुद्दामच सुट्टीच्या दिवशी मीटिंग घण्यात आली होती. या चर्चेमध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवकांच्या प्रभागामधील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.

“माझ्या नगर परिषद सदस्य म्हणून तीन टर्म पूर्ण झाल्या आहेत. पण माझ्या संपूर्ण कारकिर्दीत आजच्या पद्धतीची मिटिंग कोणत्याही मुख्याधिकाऱ्यानी घेतली नाही. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करतो. यामधून त्यांच्या यवतमाळच्या विकास संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका नाहीत. त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण आजच्या मीटिंग मुळे प्रभागाच्या समस्या मार्गी लागतील हे नक्की. यापुढे मुख्याधिकाऱ्यांना आमची कुठेही मदत लागली तर आम्ही त्यासाठी तत्पर राहू”, असे चंद्रशेखर चौधरी (माजी विरोधी पक्ष नेता, काँग्रेस) म्हणाले.