Yavatmal News : लाचखोर महसुल सहायक ACB च्या जाळ्यात, 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

>>प्रसाद नायगावकर

नागरिकांच्या सेवेसाठी नेमलेले अधिकारी नागरिकांनाच लुटत असल्याच्या अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडत आहेत. अशीच घटना आता यवतमाळमधील महागाव तहसील कार्यालयात घडली आहे. शेतकऱ्याकडे लाच मागितल्याप्रकरणी लाचखोर महसूल सहायक प्रवीण महादेव पोहकर हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

महसूल सहायक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रवीण महादेव पोहरकर असे या भ्रष्ट कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेतकरी संदीप (बदलले नाव) हिवरा येथील रहिवासी आहेत. यांची हिवरा गावाला लागून 1 हेक्टर 41 आर शेती आहे. हिवरा जिनिंग फॅक्टरीला लागून असलेला पाणंद रस्ता हा शेताकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. हा पाणंद रस्ता अतिक्रमणाने गिळला असून शेतात जाण्यास वाट राहिली नाही. पाणंद रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी संदीप यांनी मार्च 2021 पासून सरकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. यापूर्वी त्यांनी महागाव तहसील कार्यालयासमोर तब्बल तीन वेळा उपोषणही केले व आजवर कित्येक निवेदने दिले. संवेदनशुन्य शासन आणि प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या अन्यायग्रस्त शेतकऱ्याने यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे संदीप यांनी हिवरा येथे टॉवरवर चढून पुन्हा एकदा आंदोलन केले होते. तरीही या शेतकऱ्याची तक्रार बेदखलच राहिली.

महागाव तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागात या शेतकऱ्याच्या पाणंद रस्त्याचा प्रश्न लाल फितीत अडकून पडला आहे. अशातच तहसील कार्यालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी कनिष्ठ लिपिक प्रवीणकुमार पोहरकर याने शेतकऱ्यास 40 हजाराची लाच मागीतली. तडजोडी अंती 30 हजार रुपये घेण्यास तो राजी झाला होता. पाणंद रस्त्यासाठी वैतागलेल्या शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली, त्यानंतर एसीबीच्या पथकाने आज तहसील कार्यालयात सापळा लावला. लाचखोर लिपिकाला तहसिल कार्यालयातच 30 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. अधिक चौकशीसाठी त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. पोहरकर यांने शेतकऱ्याकडे मागितलेली लाच स्वतःलाच मागितली की, यात आणखी कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे. याची चौकशी केली जात आहे. प्रवीण गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना याच पद्धतीने लाच मागून त्यांना असाच त्रास देत असल्याचे उघड झाले आहे. लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय त्याच्याकडून कोणतीही फाईल वर सरकत नव्हती. नाईलाजाने शेतकरी त्याला लाचेपोटी पैसे द्यायचे प्रवीणच्या अटकेने मात्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रवीण यास कठोरात कठोर शिक्षा करून त्यास नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, जयंत ब्राम्हणकर, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, सचिन सोनवणे, सुरज मेश्राम, भागवत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली.