Yavatmal News – पोलीस कर्मचार्‍यांच्या नावापुढे लावले जाणार आईचे नाव, दिग्रसच्या ठाणेदारांचा स्तुत्य उपक्रम

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे ठाणेदार यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. दिग्रस पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटवर आता आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

माणसाची ओळख केवळ वडीलांच्या नव्हे तर आईच्याही नावाने होते. त्यामुळेच दिग्रसचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटवर आईचे नावं लावणे बंधनकारक केले आहे. सेवानंद वानखेडे यांनी आपल्या भाषणांदरम्यान आपल्या नावात आईच्या नावाचा वापर करावा यासाठी युवकांना वारंवार प्रेरित केले आहे. एवढ्यावरचं ते थांबले नाहीत, तर त्यांनी आता पोलीस ठाण्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. त्यामुळे इथून पुढे दिग्रस पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावापुढे आईचे नाव सुद्धा अभिमानाने झळकणार आहे. त्यामुळेच सेवानंद वानखेडे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.