
>> प्रसाद नायगावकर
राज्यात आणि देशात चोरीच्या अनेक घटना घडतात. मात्र, काही चोरीच्या घटना चक्रावणाऱ्या असतात. याआधी टॉमेटो, कांदा यासह महागलेल्या भाज्यांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता त्यात लसूणाचीही भर पडली आहे. पावसाळ्यात साधारण सर्व भाज्यांच्या किंमती वाढतात. तसेच कांदा, बटाटा, लसूण यांची कमतरता जाणवते. त्यामुळे याची चढ्या भावाने विक्री होते. आता लसूणाचे भाव गगनाला भिडत असल्याने चोरट्यांची नजर आता लसूणावर गेली आहे. यवतमाळमध्ये लसूणचोरीची घटना घडली असून चोरट्यांनी शोतकऱ्यांचा 2 क्विंटल म्हणजे तब्बल 200 किलो लसूणावर डल्ला मारला आहे. त्यामुळे याची चर्चा होत असून इतर शेतकऱ्यांनीही आता काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
पावसाळा सुरू झाल्याने आता बाजारपेठेत लसूणाला चांगली किंमत मिळत आहे. सध्या चांगल्या लसूण किरकोळ बाजारात 300 ते 350 प्रती किलो भाव मिळत आहे. लवकरच त्याच्या किंमती 400 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी लसूणाची काळजी घेत आहेत. तरीही चोरटे लसूणावर डल्ला मारत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ग्राम कोठा येथील श्रीकांत जयकुमार व्यवहारे यांचे त्याच ग्राम शिवारामध्ये शेत असून या शेतातील बंड्याची जाळी मोडून दोन क्विंटल लसूण आणि शेती साहित्य चोरी झाले आहे.
याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, या तक्रारीची दखल घेण्याबाबत पोलिसांची उदासीनता दिसून आली. त्यामुळे श्रीकांत व्यवहारे यांनी थेट मुख्यमंत्री तसेच संबंधित पोलिस विभाग यांच्याकडे तक्रारी पाठविल्या होत्या. या सर्व प्रकरणाची दखल घेत अखेर कळंब पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोठा येथील श्रीकांत जयकुमार व्यवहारे यांचे ग्राम कोठा येथे शेत आहे. शेतात त्यांनी मोठा गोठा बांधलेला आहे. या गोठ्याची जाळी तोडून आतमध्ये ठेवलेले फवारणीचे पंप तसेच दोन क्विंटल लसूण असा एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना 9 जुलै रोजी घडली होती. त्यानंतर याची दखल कळंब पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार दिली.आता मात्र या तक्रारीची दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.