
लाडकी लेक आयएएस झाली अन् बापाला आभाळ ठेंगणं झालं. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बापाने मोठा कार्यक्रम आयोजित केला. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. लेकीच्या यशाचं सेलिब्रेशन सुरु असतानाच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला अन् ते कायमचे दुरावले. यामुळे खंदारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद ईजार येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. त्यांची मुलगी मोहिनी यूपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मोहिनी हिची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. लेक आयएएस अधिकारी झाल्याने बापाला आनंद गननात मावेना.
मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी खंदारे कुटुंबीयांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नातेवाईक, मित्रमंडळी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सेलिब्रेशनदरम्यान खंदारे यांना हृदविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही क्षणात खंदारे कुटुंबीयांच्या आनंदावर पाणी फेरले.