यवतमाळ – राष्ट्रीय महामार्गांवर वडकी ते पिंपळखुटीदरम्यानचा 70 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय, प्रवाशांचा जीव धोक्यात

>> प्रसाद नायगावकर

पांढरकवडा शहरातून जाणाऱ्या नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर वडकी ते पिंपळखुटी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत .पण याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे . हा रस्ता बनून अवघे काहीच दिवस झाले आहेत तरिही या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वडकी ते पिंपळखुटी हा 70 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्यात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याने रस्त्याची चौकशी न करता आपसी देवाण घेवाण करून हा रस्ता उत्तम दर्जाचा असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचे समजते.

वडकी ते पिंपळखुटी या राष्टीय महामार्ग क्रमांक 44 हा कश्मीर ते कन्याकुमारी असा जातो. यामुळे या मार्गावर हजारो लांब पल्ल्याची मोठी वाहनं सुसाट वेगाने धावत असतात. पण रस्त्यावरील हे विश्वविक्रमी खड्डे चुकवितानाया मार्गावर अनेक मोठे अपघात झाले आहेत. शिवाय वडकी ते पिंपळखुटी या ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना पांढरकवडा हे शहर मुख्य बाजारपेठ असल्याने येथील नागरिक लहान वाहनांचा वापर करतात. यामुळे हे खड्डे चुकवितांना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय छोटेमोठे अपघात होऊन अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत . .

2023 वर्षअखेरपासून राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे पडू नयेत यासाठी सरकार धोरणावर काम करत आहे आणि बिल्ट-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) पद्धतीने रस्ते बांधण्याला प्राधान्य दिले जात आहे कारण अशा प्रकल्पांची देखभाल चांगल्या पद्धतीने केली जाते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्या उद्देशाने, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कामगिरीवर आधारित देखभाल आणि अल्पकालीन देखभाल करार तयार करत आहे अशी त्यांनी घोषणा केली होती .पावसामुळे महामार्गांचे खड्डे पडून नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन गडकरी म्हणाले की मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांचे सेफ्टी ऑडिट करत आहे. पण 2024 वर्ष अर्ध संपलं तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या चुकीच्या धोरणाने गडकरींची घोषणा हवेत विरली असे दिसते.

आज अर्थसंकल्प सादर होत आहे . 2023 साली गडकरींनी ज्या घोषणा केल्या होत्या , या विषयी अर्थसंकल्पात काही विशेष आर्थिक तरतुदी करून हे राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त होतील का असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.