
>> प्रसाद नायगावकर
पुण्यानंतर मुंबईत झालेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणाने मुंबई हादरली असताना आता यवतमाळमध्ये हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे हिट अँड रन केस दाखल झाली आहे . त्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला आहे .
रस्त्याच्या बाजूने घरी पायी जात असताना भरधाव कारने मागून धडक दिल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी मुकुटबन मार्गावर पेटूर येथे हा अपघात घडला. आशा जनार्दन नांदे (50) असे मृत महिलेचे नाव आहे. वणी कडून च्या दिशेने जात असलेली डस्टर कारच्या चालकाने निष्काळजीपणे भरधाव कार चालवून महिलेला मागून जोरदार धडक दिली.. अपघातात गंभीर जखमी आशा नांदे हिला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला नागपूर येथे रेफर करण्यात आले. नागपूर येथे नेत असताना वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे परत वणी ग्रामीण रुग्णालयात आणले.
मृत महिलेच्या पतीचे निधन झाले असून तिला दोन मुलं आहे. फिर्यादी मुलगा अजय जनार्दन नांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वणी पोलिसांनी डस्टर कार जप्त करून कार चालक गणेश बाबाराव झाडे विरुद्ध कलम 281, 106(1) भा.न्या.स. नुसार गुन्हा दाखल केला आहे. मृतक महिलेचे वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरहू आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसोशीने तपास करीत आहे . हा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवीत होता की नाही हा तपासाचा भाग आहे . आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल .
अनिल बेहरानी ( पोलीस निरीक्षक , वणी )