>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांकडून काही रेती तस्करांना खुली सूट, तर काही रेती तस्करांवर कारवाईच्या नावाखाली मानगुटीवर बसण्याच्या प्रयत्न सुरू आहे. याच कारवाईमुळे दिग्रस रोडवरील गांधीनगर येथे तलाठी व रेती तस्करांमध्ये मोठा राडा झाला. रेती तस्करांनी तलाठी आणि कोतवालाला घेरत मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मिंधे सरकारमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
दिग्रस-दारव्हा रोडवरील गांधीनगर जवळ अरुणावती नदी वाहते. त्या नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे. ट्रॅक्टर आणि छोटा हत्तीच्या मदतीने महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने राजरोसपणे रेती चोरी होत आहे. यादरम्यान काहींवर कारवाई केली जात असून काहींना ढिले सोडले जात आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी तलाठी व कोतवाल गस्तीसाठी आले असता रेती माफियांशी त्यांचा वाद झाला.
रेतीने भरलेले ट्रॅक्टर का सोडले आणि आमचीच गाडी का पकडली? सर्वांना समान न्याय द्या. एकाची गाडी पकडायची आणि दंड लावायचा व दुसऱ्याला मात्र सूट द्यायची, हा कुठला न्याय? असे म्हणत रेती माफियांनी तलाठी आणि कोतवालाला घेरले. या दरम्यान झालेल्या शाब्दिक वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. रेती तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यांसह तलाठी आणि कोतवालाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, रेती माफियांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची लेखी तक्रार तलाठी जयंत प्रकाश व्यवहारे यांनी दिग्रस पोलीस स्थानकात दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मतीन शेख मोबीन (वय – 50), लकी मतीन शेख (वय – 30) आणि गोलू मतीन शेख (वय – 23, सर्व रा. आंबेडकर नगर) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 379, 294, 143 आणि 506 अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहे.