‘यशवंत’च्या जागेची 299 कोटींना खरेदी? फुकटातील सोडून विकतची जमीन कोणासाठी?

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सुमारे 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांत विक्री आणि खरेदीचा ठराव शुक्रवारी संयुक्त संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. दरम्यान, थेऊर येथील या जमिनीला लागून साष्टे येथे पीएमआरडीएचे पुणे बाजार समितीसाठी 53 एकर गायरान जमिनीचे आरक्षण पडले असून ही जागा अगदी फुकटात मिळणार आहे. असे असताना कोट्यवधींची जमीन घेऊन बाजार समितीला गोत्यात आणण्याचा अट्टाहास का सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची देणी देणे व भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची 99.27 एकर जमीन सुमारे 335 कोटी एवढ्या रकमेस विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे बाजार समितीस 30 ऑक्टोबर 2024 रोजी दिला होता. विशेष बैठकीत कारखान्याच्या मालकीची सुमारे 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांत विक्री आणि खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

बाजार समिती आणि कारखान्याच्या संचालक मंडळाचे संयुक्त बैठकीत कारखान्याची जमीन 299 कोटी रुपयांना बाजार समितीला देण्याचा निर्णय झाला. इतर शासकीय परवानग्या घेऊन ही जागा घेतली जाईल, असे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत बाजार समिती आणि कारखान्याच्या संचालकांनी संयुक्त बैठक घेऊन किंमत ठरविली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या समोर व्हावा, असे बाजार समितीचे संचालक रोहिदास ऊंद्रे यांनी म्हटले आहे.