यशवर्धन दलाल नाबाद 428; सी. के. नायडू स्पर्धेत प्रथमच चारशतकी धावसंख्या, मुंबई दारुण पराभवासमीप

हरयाणाच्या सलामीवीर यशवर्धन दलालने 23 वर्षांखालील सी.के. नायडू ट्रॉफी स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक नाबाद 428 धावांची खेळी करत स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. या प्रदीर्घ शतकी खेळीच्या जोरावर हरयाणाने 8 बाद 728 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यानंतर मुंबईचा पहिला डाव 162 धावांत आटोपला आणि मग दुसऱया डावातही 3 बाद 38 अशी भयाण स्थिती झाल्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशीच मुंबईचा दारुण पराभव निश्चित मानला जात आहे. मुंबईला डावाचा मारा टाळण्यासाठी 528 धावा करायच्या आहेत.

काल हरयाणाच्या सलामीवीर यशवर्धनने 400 धावांचा टप्पा गाठत 23 वर्षांखालील मुलांच्या सी.के. नायडू स्पर्धेत वैयक्तिक धावांचा नवा उच्चांक गाठताना उत्तर प्रदेशच्या समीर रिझवीचा 266 चेंडूंतील 312 धावांच्या खेळीच्या विक्रमाला मोडीत काढीत नवा विक्रम रचला. समीरने गेल्याच मोसमात सौराष्ट्रविरुद्ध ही खेळी साकारली होती. तसेच 2021 मध्ये 16 वर्षांखालील मुलांच्या साखळी स्पर्धेत हरयाणा क्रिकेट अकादमीकडून खेळताना 237 धावांचा घणाघात सादर केला होता. 5 बाद 425 धावांवर डाव घोषित करणाऱया अकादमीने हा सामना 368 धावांनी जिंकला होता. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एका फलंदाजाने 400 धावांचा टप्पा गाठण्याची करामत करून दाखवली. त्याने आपल्या अद्वितीय खेळीत 465 चेंडूंना सामोरे जाताना 46 चौकार आणि 12 षटकार लगावले. म्हणजेच 256 धावा त्याने चौकार-षटकारानिशी फटकावल्या.

यशवर्धनने 8 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सामन्यात पूर्ण दोन दिवस फलंदाजी करत हा विक्रम रचला. त्याने पहिला दिवस मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरशः घामटा काढताना एकही विकेट मिळू दिला नाही. त्याने अर्श रंगासह पहिल्या विकेटसाठी 410 धावांची सलामी दिली होती. ही जोडी 98 व्या षटकात फुटली. रंगाने 151 धावांची खेळी केली. त्यानंतर यशवर्धनने तिसऱया विकेटसाठी 82 तर चौथ्या विकेटसाठी 75 धावांची भागी रचत संघाला सहाशेचा टप्पा ओलांडून दिला होता. त्यानंतर त्याने एकहाती किल्ला लढवत संघाला सातशेपार नेले.

मुंबईच्या चार गोलंदाजांची शतके

मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. मात्र यशवर्धनच्या फटकेबाजीमुळे धनित राऊत (154), प्रेम देवकर (112), अर्थव भोसले (145) आणि अथर्व कर्डिले (129) या गोलंदाजांना शंभरपेक्षा अधिक धावा चोपून काढण्यात आल्या. मुंबईच्या फलंदाजीत एकाही फलंदाजाला पन्नाशीही गाठता आली नाही. मनन भट्टने सर्वाधिक 47 धावा केल्या. हरयाणाच्या पार्थ वत्सने 19 धावांत मुंबईचा अर्धा संघ गारद केला. पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की सहन करणाऱया मुंबईची दुसऱया डावातही 3 बाद 38 अशी केविलवाणी अवस्था झाल्यामुळे चौथ्या दिवशी मुंबईचा लाजीरवाणा पराभव निश्चित आहे.