यशश्रीचा मारेकरी दाऊदच्या मुसक्या गुलबर्ग्यात आवळल्या; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची प्रेम प्रकरणातून पाच दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तिला ठार मारणारा प्रियकर दाऊद शेख याच्या आज पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या.

दाऊद लोकेशन बदलत वारंवार गुंगारा देत होता. पण नवी मुंबई पोलिसांनी धडक कामगिरी करीत त्याला ताब्यात घेतले असून या हत्याकांडातील अन्य साथीदारांना लवकरच अटक केली जाणार आहे. दरम्यान यशश्रीची हत्या करणाऱ्या नराधम दाऊदला फासावर लटकवा, अशी मागणी करीत आज ठाण्यासह चिरनेर, अलिबाग तसेच पेणमध्ये मोर्चे काढण्यात आले. त्यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व महिलांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला.  उरणच्या प्रतीक अपार्टमेंटमध्ये राहणारी यशश्री शिंदे हिची प्रेमप्रकरणातून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. ही हत्या करणारा दाऊद शेख हा फरार झाला होता. या सैतानाने यशश्रीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते निर्जनस्थळी फेकून दिले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला तर शिंदे कुटुंबाचे भावविश्वच उद्ध्वस्त झाले आहे.

वादातून हत्या झाल्याचा संशय

अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, दाऊद आणि यशश्री यांची पूर्वीपासून ओळख होती. ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. दाऊद हा कोरोना काळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र काही दिवसापूर्वी तो उरण येथे पुन्हा आल्यानंतर दोघांनी भेटण्याचे ठरवले होते. या भेटीदरम्यान दोघांचे काही वाद झाले व त्यातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज साकोरे यांनी व्यक्त केला.

असा आला जाळ्यात

पोलिसांनी यशश्रीचा शोध घेतला खरा पण तिच्या मृतदेहावर अनेक वार दिसत होते. तिचा चेहरा ओळखताही येत नव्हता. दाऊदला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी स्वतंत्र पोलीस पथके गुलबर्ग्याला पाठवून त्याचा शोध सुरू केला. त्याच्या नातेवाईक व मित्रांची चौकशी केली असता तो कर्नाटकातील शहापूर या गावाजवळ  अलर परिसरात असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबईचे पोलीस स्थानिक पोलिसांच्या साथीने चार दिवस तिथे मुक्काम ठोकून होते. दाऊद हा सतत आपल्या मोबाईलचे लोकेशन बदलत होता. तसेच अनेकदा त्याने फोनही स्विच ऑफ केला. तरीही आज पहाटेच पोलिसांनी मोठय़ा शिताफीने  दाऊदच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, यशश्री हिच्या चेहऱ्यावर ओरबाडल्याच्या खुणा होत्या. कदाचित भटक्या श्वानांनी तिचा चावा घेतला असावा, असे शवविच्छेदन केल्यानंतर दिसून आले आहे.