Yashasvi Jaiswal Wicket – बांगलादेशच्या पंचांची चूक? टीम इंडियाला फटका, सुनील गावस्कर यांच्यासह सर्वच भडकले

मेलबर्न कसोटीत पाचव्या दिवशी फॉर्मात असलेल्या यशस्वी जयस्वालची विकेट गेली आणि टीम इंडियाचे सामना जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. टीम इंडियासाठी यशस्वीचे मैदानावर टिकून राहने महत्त्वाचे होते. परंतु यशस्वीला बांगलादेशच्या अंपायरने चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केले. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून टीम इंडियाचे चाहते चांगलेच भडकले आहेत. तसेच टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनीही पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला जिंकण्यासाठी 340 धावांचे आव्हान दिले होते. परंतु आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे फलंदाज हजेरी लावून तंबुत परतत होते. मात्र यशस्वी एका बाजूने खिंड लढवत होता. 208 चेंडूंमध्ये 84 धावांपर्यंत त्याने मजल मारली होती. परंतु पॅट कमिंन्सच्या 71 व्या षटकातील पाचव्या चेंडूंवर त्याला तिसऱ्या पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केले. कमिन्सने टाकलेला शॉर्ट चेंडू यशस्वीने लेग साईडला मारण्याच्या प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटच्या अगदी जवळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. ऑस्ट्रेलियाने दाद मागितली परंतु मैदानावरील पंच विल्सन यांनी त्यांची दाद फेटाळून लावली. त्यामुळे ऑस्ट्रेलिलयाने रिव्ह्यू घेतला. ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतलल्यानंतर बांगलेदशचे तिसरे पंच शरफुद्दौला यांनी चाचपणी केली असता, त्यांना स्निकोमीटमध्ये चेंडू बॅटला लागल्याची कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे नियमानुसार यशस्वीला नाबाद घोषित करणे गरजेचे होते. परंतु शरफुद्दौला यांनी त्याला बाद घोषित केल्याने सर्वांनाच धक्का बसला. “जर तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत घ्यायची असेल, तर असे निर्णय का दिले जातात, असा संतप्त सवाल सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

“यशस्वी जयस्वाल क्लिअर नाबाद होता. तिसऱ्या पंचांनी तंत्रज्ञान काय संकेत देत आहे, त्यावर लक्ष दिले पाहिजे. मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे त्याचे ठोस कारण असले पाहिजे, असे राजीव शुक्ला यांनी एक्सवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.