
इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू असतानाच टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. यशस्वी जैस्वाल लवकरच मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याची शक्यता आहे. या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक ई-मेल पाठवला असून आगामी हंगामात (2025-26) मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्यासाठी एनओसी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
23 वर्षीय यशस्वी जैस्वाल याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत टीम इंडियामध्ये स्थान पक्के केले. आझाद मैदान ते टीम इंडिया हा त्याचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. आता तो हिंदुस्थानचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सिद्धेश लाडच्या पावलावर पाऊल टाकून मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळण्याच्या तयारीत आहे. आगामी हंगामात त्याच्याकडे गोवा संघाच्या नेतृत्वाची धुरा येण्याची शक्यता आहे. याचमुळे त्याने एमसीएकडे एनओसीची मागणी केली आहे.
एमसीएकडून एनओसी प्रमाणपत्र मिळताच यशस्वीचा गोव्याकडून खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत यशस्वीने चांगली कामगिरी केली होती. मात्र आयपीएलमध्ये अद्याप त्याच्या बॅटमधून धावा बरसलेल्या नाहीत. आता आयपीएल मध्यावर असतानाच त्याने मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
याबाबत एमसीएच्या सूत्रांनी बुधवारी पीटीआयशी बोलताना सांगितले की, त्याचा हा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. पण त्याने हा निर्णय घेताना काहीतरी विचार केला असणारच. त्याने स्वत:ला रिलिज करण्याची मागणी केली असून आम्ही त्याची मागणी स्वीकारली आहे.
गेल्या हंगामात यशस्वी जैस्वाल मुंबईकडून खेळला होता. त्याने जम्मू-कश्मीर विरूद्धच्या रणजी लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. या लढतीत त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 26 धावा काढून तो बाद झाला होता. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वीच्या नावाचा विचार झाला नव्हता, त्याला नॉन ट्रॅव्हल रिझर्व्हवाल्या लिस्टमध्ये ठेवण्यात आले होते. अशातच 17 फेब्रुवारी रोजी विदर्भ संघाविरुद्ध झालेल्या सेमीफायनल लढतीसाठी त्याचा समावेश मुंबईच्या रणजीच्या संघात करण्यात आला होता. मात्र त्याने दुखापतीचा हवाला देत न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
यशस्वीची कारकिर्द
यशस्वी जैस्वाल याने प्रथम श्रेणीचे 36 सामने खेळले आहेत. यात त्याने 60.85 च्या सरासरीने आणि 13 शतकांच्या मदतीने 3712 धावा केल्या आहेत. 265 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने 19 कसोटी सामने खेळले असून यात त्याच्या नावावर 4 शतकांसह 1798 धावांची नोंद आहे. नाबाद 214 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहेत. त्याने एक वन डे सामना आणि 23 टी-20 सामनेही खेळले आहेत. टी-20मध्येही त्याच्या नावावर एका शतकाची नोंद आहे.