चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता

19 फेब्रूवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून त्याची पूर्व तयारी म्हणून इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे पाहिले जातेय. ऑस्ट्रेलियातील कसोटी पराभवांचा हिंदुस्थानी संघावर काहीसा फरक पडणार असून 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या यशस्वी जैसवालसाठी वन डे क्रिकेटचे द्वार उघडले जाण्याची शक्यता आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवणारा नितीशकुमार रेड्डीलाही संघात स्थान दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे गेले वर्षभर संघाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचेही वेध लागले आहे.

ऑस्ट्रेलियातील अपयश धुवून काढण्यासाठी हिंदुस्थानी संघाला आगामी इंग्लंडविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडकात जोरदार कामगिरी करावी लागणार आहे. हिंदुस्थानी संघाची एकदिवसीय क्रिकेटमध्ये कामगिरी उत्साहवर्धक असली तरी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अखेरच्या मालिकेत हिंदुस्थानला 2-0 अशी हार सहन करावी लागली होती. विशेष म्हणजे या मालिकेत रोहित शर्मासह विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल असे सारेच स्टार फलंदाज होते. या मालिकेतही हिंदुस्थानचे स्टार पूर्णता अपयशी ठरले होते. त्यामुळे पाच महिन्यांनी होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात काही बदल करण्याची तयारी निवड समितीने केली आहे. या मालिकेत मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाचपणी करण्यासाठी त्यालाही संधी देण्याची तयारी करण्यात आल्यामुळे नर्‍या दमाच्या कोणत्या गोलंदाजाला संघाबाहेर जावे लागणार, हे येत्या दोन दिवसांत कळेलच.

गेले वर्ष गाजवणार्‍या यशस्वी जैसवालने आतापर्यंत 19 कसोटीत 1798 धावा तर 23 टी-20 सामन्यांमध्ये 723 धावा केल्या आहेत. पण संघात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहुलसारखे आघाडीवीर असल्यामुळे यशस्वीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीड वर्षे उलटूनही वन डेत पदार्पणाची संधी अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र आता त्याच्या धडाकेबाज फलंदाजीची निवड समितीला नक्कीच दखल घ्यावी लागणार आहे. तसेच नितीश रेड्डीलाही मधल्या फळीत आजमावण्याच्या तयारीत टीम इंडिया आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू हार्दिक पंड्याचेही नाव शर्यतीत असल्यामुळे या खेळाडूंना संघात सामावताना निवड समितीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बुमराचे काय होणार
आगामी चॅम्पियन्स करंडकासाठी संघात बुमरा खेळावा म्हणून त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळवणार की विश्रांती देणार याचा निर्णय निवड समितीच्या हातात आहे. बुमराच्या अनुपस्थितीत शमीचे संघात असणे गरजेचे आहे. तसेच चॅम्पियन्स करंडकासाठी हे दोन्ही गोलंदाज हिंदुस्थानी संघाची खरी ताकद असेल. त्यामुळे आगामी मालिकेसाठी बुमराचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
आगामी मालिकांसाठी अशी निवड असू शकते
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा, यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज , हर्षित राणा.